पुणे : नवी सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. अर्जुन डोके, सांस्कृतिक समन्वयक डॉ. सुवर्णा खोडदे, व्याख्यात्या डॉ. ज्योती रामोड, वरिष्ठ लिपिक अनुरिता गायकवाड आदी उपस्थित होते.
'सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवन प्रवास' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील डॉ. ज्योती रामोड यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाज प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करत शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अंगानी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य स्पष्ट केले.
आपल्या मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलणे हेच सावित्रीबाईंना खऱ्या अर्थाने अभिवादन असल्याचे नमूद केले.सदर कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ.अनिल लोंढे, डॉ. नागेश भंडारी, डॉ. विठ्ठल नाईकवडी यांनी केले असून आभार प्रदर्शन डॉ. वंदना पिंपळे यांनी केले.