सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

सीपीआरचे महत्त्व वेळीच समजून घेण्याची गरज : डॉ. मंदार अक्कलकोटकर यांचे आवाहन

डिजिटल पुणे    03-01-2025 17:50:12

पुणे : कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका आश्चर्यकारक घटनेने पुन्हा एकदा सीपीआर (कार्डियोपल्मनरी रिससिटेशन) या जीवनदायी तंत्राच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. एका मृत घोषित व्यक्तीने रुग्णवाहिकेतून नेत असताना गाडीला बसलेल्या धक्क्यामुळे पुन्हा श्वास घ्यायला सुरुवात केली. ही घटना समाजाला जीवन वाचवण्यासाठी तातडीच्या वैद्यकीय प्रक्रियांची जाणीव करून देणारी ठरली आहे.

'पुणे लाइफ गार्डस्' या जनजागृती करणाऱ्या संस्थेचे मुख्य सल्लागार डॉ. मंदार अक्कलकोटकर यांनी या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना सीपीआरच्या महत्त्वाची जाणीव करून दिली आहे. "सीपीआर ही तातडीची वैद्यकीय मदत असून, हृदयविकाराचा झटका आल्यावर किंवा श्वास थांबल्यावर ही प्रक्रिया व्यक्तीला पुन्हा जीवनदान देऊ शकते," असे त्यांनी सांगितले. अशा घटना केवळ वैद्यकीय व्यावसायिकांपुरती मर्यादित राहता कामा नयेत, तर प्रत्येक सामान्य नागरिकानेही सीपीआरची माहिती घेतली पाहिजे.
डॉ. अक्कलकोटकर यांनी  घटनेमागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले की रुग्णवाहिकेत गाडीच्या खड्ड्यातून जाण्यामुळे बसलेला धक्का सीपीआरसारखा प्रभाव निर्माण करू शकतो. या प्रक्रियेमुळे हृदयाला कृत्रिमरित्या रक्त पंप करण्यास मदत होते. छातीवर दाब दिल्यास मेंदूस ऑक्सिजन पुरवठा होतो आणि हृदय पुन्हा कार्यशील होण्यास मदत होते.

सीपीआर प्रशिक्षणाची गरज

"जर प्रत्येक व्यक्तीने सीपीआरचे योग्य प्रशिक्षण घेतले, तर आणीबाणीच्या प्रसंगी अधिकाधिक लोकांचे प्राण वाचू शकतात," असे डॉ. अक्कलकोटकर यांनी नमूद केले. त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सीपीआर प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ. अक्कलकोटकर यांनी नागरिकांना सीपीआरसंदर्भात जागरूक राहण्याचे आवाहन केले. "साध्या साधनांद्वारे मोठा बदल घडवता येतो. सीपीआर शिकणे ही काळाची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही प्रक्रिया जीवन वाचवणारी ठरू शकते," असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरमधील घटनेने सीपीआरच्या तातडीच्या उपयुक्ततेवर भर दिला आहे. नागरिकांनी सीपीआर शिकून आणीबाणीच्या प्रसंगी याचा योग्य उपयोग करावा, असे डॉ. अक्कलकोटकर यांनी आवर्जून सुचवले आहे. त्यांच्या या आवाहनाने वैद्यकीय आपत्कालीन मदतीबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.
 
महाविद्यालयातून व्हावे प्रशिक्षण :युजीसी 
अचानक हृदय बंद पडणे (सडन कार्डियाक ॲरेस्ट) हे देशातील अकाली मृत्यूचे मुख्य कारण असून प्रतिवर्षी सुमारे दहा लाख व्यक्ती या विकारामुळे मृत्युमुखी पडतात. हृदयविकार तज्ञांचे मते त्यानंतर ची तीन ते दहा मिनिटे ही अत्यंत महत्त्वाची असतात. उपस्थित व्यक्तीने वेळेमध्ये योग्य प्रकारे छाती दाबणे व श्वास देणे ज्याला सीपीआर म्हणतात सुरू केल्यास सुमारे साडेतीन लाख लोकांचा जीव वाचू शकतो. देशातील जेमतेम एक दशांश टक्का (0.1%) नागरिकांना बीएलएस ची माहिती असते. विश्वविद्यालय अनुदान आयोगाने(युजीसी ) 30 मे 2024 रोजी देशातील सर्व विश्वविद्यालयाचे कुलपती जे सामान्यतः महामहीम राज्यपाल ही असतात, त्यांना पत्र लिहून उच्च शिक्षण संस्थांमध्ये बेसिक लाईफ सपोर्ट से प्रशिक्षण देण्यासाठी सुचवले आहे. हे परिपत्रक सर्व महाविद्यालयांचे प्राचार्यांनाही पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आत्ययिक चिकित्सा  तज्ञांचे मदतीने हे तंत्र महाविद्यालयातील सर्व व्यक्तींनी शिकून घेणे अपेक्षित आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. मंदार अक्कलकोटकर  98227 77161


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती