पुणे : भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने नुतन कॅलेंडर वर्षा निमित्त निर्मित "श्री दिनदर्शिका २०२५" चा प्रकाशन सोहळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन श्री तीर्थक्षेत्र आळंदी येथे "ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील (महाराज)" यांच्या हस्ते संपन्न झाला.
श्री क्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी मंदिर, श्री अमृतनाथ स्वामी स्वामी महाराज मठ, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ आदी ठिकाणी श्रींचे दर्शन घेऊन या पवित्र भूमीत अशा प्रकारे कार्यक्रम करीत असताना समितीच्या भावनांचे पुरुषोत्तम महाराजांनी विशेष कौतुक केले.
समितीच्या वतीने वेळोवेळी होत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची इत्यंभूत माहिती घेत पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण संघटित होऊन एक वेगळाच आदर्श पुढच्या पिढी समोर ठेवत असल्याचा आनंद व्यक्त करीत पुरुषोत्तम महाराजांनी सदस्यांच्या संकल्पनांचे भरभरून कौतुक केले अन् पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिले.
आपल्या व्यस्त कार्यपत्रकात समितीच्या या समारंभाकरीता वेळ राखून ठेवल्याबद्दल समितीच्या वतीने हभप पुरुषोत्तम दादा पाटील (महाराज) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराजांचे आभार प्रदर्शन करीत असताना येणाऱ्या काळात असेच कार्यरत राहून आपल्या भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्यास प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन समितीच्या प्रमुख विश्वस्तांनी दिले.