पुणे: 'ओपन आयडियाज राष्ट्रीय स्पर्धा-२०२४' आणि हाउसिंग स्टुडिओ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा चेंबरचे सुमंत मुळगावकर सभागृह(सेनापती बापट रस्ता,पुणे) येथे झाला.ही स्पर्धा हॅबिटॅट फोरम (आयएनएचएएफ) आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.यामागील उद्दिष्ट लहान व कमी खर्चाची घरे अधिक राहण्यायोग्य बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हे होते. हे चवथे वर्ष होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बरजोर मेहता(अध्यक्ष,सीईपीटी युनिव्हर्सिटी,अहमदाबाद) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष योगेश काजळे ,हैबिटेट फोरम चे संस्थापक किर्ती शाह,शेल्टर ऑर्गनायझेशनच्या प्रतिभा जोशी, माजी खासदार अॅड.वंदना चव्हाण,व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी,डॉ.अनघा पुरोहित,डॉ.पूर्वा केसकर, अपूर्वा कुलकर्णी, हृषीकेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.द्वैपायन चक्रवर्ती यांनी प्रास्ताविक केले.
या स्पर्धेसाठी वास्तुविशारद,इंटीरियर डिझायनर,नियोजनकर्ते,अभियंते,वरिष्ठ विद्यार्थी,स्वयंसेवी संस्था,शासकीय संस्थांमध्ये काम करणारे व्यावसायिक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन व उन्नती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग मागवण्यात आला होता.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) व इतर परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनांसाठी घरांची रचना अधिक कार्यक्षम,राहण्यायोग्य आणि शाश्वत बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही स्पर्धा मे २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती.एकूण २८७ स्पर्धक नोंदणीकृत झाले व ६५ प्रस्ताव प्राप्त झाले.त्यापैकी पाच प्रस्ताव परीक्षकांनी निवडले.याच विषयावर आधारित १२ आठवड्यांचा हाउसिंग स्टुडिओ उपक्रम देखील स्पर्धेसोबतच राबवला गेला.हे स्टुडिओ भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पुणे येथे हॅबिटॅट फॉर्म द्वारे पथदर्शी स्वरूपात राबवले गेले.पुण्यातील ब्रिक ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स,विश्वकर्मा विद्यापीठ आणि वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वेल्लोर यांच्यासह तीन महाविद्यालयांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमातून एकूण २१ प्रस्ताव सादर करण्यात आले, परीक्षक मंडळाने त्यातील तीन प्रस्ताव विजेते घोषित केले. त्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
खऱ्या समस्या सोडवा : बरजोर मेहता
बरजोर मेहता म्हणाले,' युवकांच्या नवकल्पना, ऊर्जा नव्या जगाचे प्रश्न सोडवेल. डिझाईन प्रोफेशन ची जबाबादारी वाढत आहे. वैयक्तिक, मार्केट,सरकार या पातळ्यांवर चित्र बदलले आहे. कागदावर चांगले दिसणारे आराखडे प्रत्यक्षात अपयशी ठरत आहेत. युवकांनी नवी आव्हाने पेलली पाहिजेत. बाजारपेठेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. फक्त आराखडे करण्याऐवजी खरेखुरे प्रश्न सोडवले पाहिजेत. मनुष्यकेंद्री, शाश्वत संकल्पना पुढे आणल्या पाहिजेत.
शहरे गॅस चेंबर होऊ देऊ नका: अॅड.वंदना चव्हाण
शहरं वाढत असून समस्या वाढत आहे. वस्तुस्थिति समजून घेऊन धोरणकर्ते आणि राज्यकर्ते वागले पाहिजेत. शहरं विकासाची केंद्रे असली तरी सर्वांना राहण्यासाठी पुरेशी नाहीत. आर्किटेक्ट मंडळींनी डीसी रूल्स सारखे नियम पाळण्याचा आग्रह धरला पाहिजे. बांधकाम क्षेत्रात चटईक्षेत्र वाढवले जात आहे. तेवढी शहरांची क्षमता आहे का हे पाहिले पाहिजे. शहरांची गॅस चेंबर होऊ देऊ नका.हवा,पाणी काही सुरक्षित राहिलेले नाही.हा धोक्याचा इशारा आपण ओळखला पाहिजे.
प्रतिभा जोशी यांनीही नागरी वस्त्यातील घर बांधणी समस्या बाबत माहिती दिली.योगेश काजळे म्हणाले,' नागरी वस्ती, झोपडपट्टीत बांधकाम करणे हा दुर्लक्षित भाग असू नये.कमी जागेत सुविधाजनक करणे सोपे नाही.कीर्ती शाह यांनीही शहरी घरे आणी समस्या यावर मार्गदर्शन केले.गृह बांधणी हा राष्ट्रीय आणी सामाजिक प्रश्न बनला आहे. चांगले घर हा मानवी हक्क आहे, हे विसरता कामा नये, असे ते म्हणाले.
विजेत्यांचा गौरव
सिडको पुनर्विकास प्रकल्प, काळमंडई प्रकल्प, ठक्कर बाप्पा कॉलोनी, जहागीरबाद योजना यांना ओपन आयडियाज राष्ट्रीय स्पर्धा-२०२४' स्पर्धेतील पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हौसिंग स्टुडिओ उपक्रमात चिरंतन पाटील, वेदश्री कुलकर्णी, हर्ष अगरवाल, सादिया अन्सारी यांना गौरविण्यात आले.