पुणे : वडगाव दाभाडी (सर्वे नं. ८/३), आंबेगाव, पुणे-४६ येथील नागरिकांना गेल्या १२ ते १३ वर्षांपासून पिण्याच्या पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न
या परिसरातील नागरिकांना महिनोंमहिने नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे प्रत्येक सोसायटीला दररोज २००० रुपये मोजून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून, ही सुविधा आहे की पालिकेचा हेतुपुरस्सर आखलेला डाव? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.तसेच, पालिकेची कचरा संकलन गाडी वेळेवर येत नाही, परिणामी कचऱ्याचा ढीग वाढत असून, आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. याच परिसरालगत असलेल्या भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा आणि कचरा संकलन सेवा सुरळीत सुरू असताना, वडगाव दाभाडीमधील नागरिकांना मात्र यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पालिकेला निवेदन – त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
परिसरातील स्थानिक नागरिक व पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या वतीने आज सोमवार, दि. १० मार्च २०२५ रोजी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त यांनी या भागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी जर लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला गेला नाही, तर सर्व नागरिकांना एकत्र करून क्षेत्रीय कार्यालयाच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
बैठकीस उपस्थित मान्यवर
या निवेदनप्रसंगी स्थानिक नागरिक स्वाती रायरीकर, कॉन्सेस फर्नांडिस, धनश्री दुधाने, संगीता चौधरी, अशोक जंगम, संगीता चौधरी तसेच संघटनेचे योगेश वाडेकर आणि विजय क्षीरसागर उपस्थित होते.जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर नागरिकांचे आंदोलन अटळ असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.