मुंबई : काल 20 नोव्हेंबररोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडले. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात, तर मुंबईत सर्वात कमी 52.07 टक्के मतदान झालं आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यम संस्थांचे एक्झिट पोल्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यात वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. यंदा राज्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसे तसेच इतर आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापैकी आता कुणाला सर्वाधिक जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दोन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. काही एक्झिट पोल्समध्ये राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळणार, याबाबत महत्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीत मनसेला 2019 च्या तुलनेत चांगले यश मिळणार, असा अंदाज आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक जागा ही महत्वाची असणार आहे. त्यातच काही पोल्समध्ये मनसेला फक्त 2 किंवा 4 जागा मिळणार, असा अंदाज आहे. मात्र, मनसेने जिंकलेल्या दोन ते चार जागा या निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
एका प्रसिद्ध एक्झिट पोलनूसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचा अंदाज समोर आला आहे.
भाजप- 78
काँग्रेस- 60
एनसीपी शरद पवार- 46
शिवसेना-उबाठा- 44
शिवसेना शिंदे गट – 26
एनसीपी-अजित पवार- 14
मनसे, वंचित, एमआयएम, अपक्ष व इतर- 20 जागा (Exit Polls Result 2024)
राज्यात कुणाची सत्ता येणार?
तसेच, यावेळी विधानसभेत जरांगे फॅक्टर चालणार नसल्याचं देखील बोललं जातंय. लोकसभेत अनेक मतदारसंघात जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला. त्यामुळे विधानसभेतही मराठा कौल कुणाला असणार त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. काही एक्झिट पोलमध्ये विधानसभेत जरांगे फॅक्टरचा प्रभाव काम करणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाहायला गेले तर सर्वच एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहे. हा फक्त अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज कितपत खरे ठरणार, याबाबतचे चित्र हे 23 नोव्हेंबररोजीच स्पष्ट होईल. राज्यात आता कुणाची सत्ता स्थापन होणार, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.