नवी दिल्ली : संसदेच हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना बोलू द्यावे आणि त्यांना चर्चा करण्याची संधी द्यावी, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, खासदारांनी संसदेत सक्रियपणे चर्चा केली पाहिजे, जेणेकरून लोकशाहीचा आदर राखला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदींनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. नवनिर्वाचित खासदारांची संसदेत सक्रिय सहभाग घेत चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मोदींनी सांगितले.
महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीनंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मणिपूर हिंसाचार आणि गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत बजावलेला वॉरंट या प्रकरणांवरुन केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभेत आणि पोटनिवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे एनडीए सरकारचे मनोधर्य वाढले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जनतेने ८० ते ९० वेळा नाकारलेली लोक संसदेत गोंधळ घालत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी हा हल्ला करत अधिवेशनात भाजप आक्रमक राहणार असल्याचे दाखवून दिले.
ती लोक संसदेचे काम चालू देत नाही
नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ विधेयक मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनातील चर्चेत जास्तीत जास्त खासदारांनी सहभागी व्हावे. परंतु जनतेने ज्यांना आतापर्यंत ८० ते ९० वेळा नाकारले आहे, ते संसदेत चर्चा होऊ देत नाही. संसदेचे कामकाज ठप्प करतात. ते लोकांच्या अपेक्षा समजून घेत नाही. त्यामुळे जनतेला वारंवार त्यांना नाकारावे लागत आहे, असे राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले.
संसदेचे काम ठप्प झाल्यावर सर्वाधिक वेदना नवीन खासदारांना होत आहे. कारण त्या खासदांचे अधिकार काही लोक दाबून टाकतात. त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीत मागील पुढीने पुढील पिढीला तयार करायचे असते. काही विरोधी पक्ष जबाबदारीने काम करत आहे. संसदेचे काम चालू देण्याची त्यांची इच्छा असते. परंतु ज्यांना जनतेने नाकारला आहे, ते त्यांना दाबून टाकतात, असे मोदी यांनी म्हटले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या निवडणुकांना विद्यामान सरकारला अधिक ताकद दिली आहे. आता संसदेत प्रत्येक मुद्यावर सखोल विश्लेषण झाले पाहिजे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. जगात भारताचे आकर्षण वाढत आहे. त्याला बळ मिळावे, असे उदाहरण आपण ठेवले पाहिजे. संसदेतून तो संदेश गेला पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.