मुंबई : विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. यात एकट्या भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही दमदार कामगिरी केली. या विजयानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “”आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. साहजिकच आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. या निकालासाठी आम्ही महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या जनतेचे आभार मानतो,” असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीकाही केली. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, अशी टीका कंगना यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचा पराभव असा होईल याची अपेक्षा होती का?, असा प्रश्न कंगना यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “होय, मला ही अपेक्षा होती. कारण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे आणि माझे बरेच रील्ससुद्धा व्हायरल होत आहेत की आपण दैत्य आणि देवता यांना कसं ओळखतो? जे महिलांचा अनादर करतात, ते त्याच श्रेणीतील असतात. ते दैत्यच असतात. जे महिलांचा आदर करतात, ते देवतासमान असतात. आज महिलांना 33 टक्के आरक्षण, टॉयलेट्स, धान्य, गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. त्यावरून समजतंय की कोण दैत्य आणि कोण देवता आहे? त्यामुळे दैत्यांचं तेच झालं, ते नेहमीपासून होत आलंय. त्यांचा पराभव झालाय.”
याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “महाभारतात एकच कुटुंब होतं, पण तरी त्यांच्यात किती फरक होता ते पहा. जे महिलांचा अपमान करतात, त्यांना अशीच वागणूक मिळते. माझं घर तोडलं गेलं, मला शिवीगाळ करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसून येतंच होतं. काँग्रेसलाही जनतेकडून मजबूत उत्तर मिळालं आहे. हा देश बऱ्याच बलिदानांनी बनला आहे. त्यामुळे काही मूर्ख लोक एकत्र आले तरी या देशाचे तुकडे होऊ शकत नाहीत आणि आम्ही होऊ देणारही नाही.” मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे पाहता, असा प्रश्न विचारला असता पक्षातील वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असं उत्तर कंगना यांनी दिलं.