मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस गावी गेल्यानं सत्ता स्थापनेची प्रक्रिया मंदावली. काल गावाहून परतलेले एकनाथ शिंदे यांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत्या. पण त्या सगळ्या रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने सोमवारी सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आमदारांची बैठकही पुढे ढकलण्यात आली. शिंदे ठाण्यात राहून आराम करणार असून दिल्लीतील भाजप बैठकीला त्यांचा सहभाग शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी अपेक्षित असला तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मागील आठवड्यात दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे दरे गावी गेले होते, तिथेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते.
एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही होते. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. शिंदे यांनी शहांशी स्वतंत्र चर्चादेखील केली. बैठक सकारात्मक झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर ते मुंबईत परतले. यानंतर मुंबईत महायुतीच्या पुढील बैठका होणार होत्या. मात्र ३० नोव्हेंबरला शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी अचानक निघून गेले. शिंदे आराम करण्यासाठी तिथे गेल्याचं सांगण्यात आलं
गावी गेल्यानंतर शिंदेंची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या पथकानं त्यांच्यावर उपचार सुरु केले. यानंतर १ डिसेंबरला एकनाथ शिंदे ठाण्यात परतले. सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार भाजप नेतृत्त्वाला दिले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी दरे गावातून निघताना केला. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नाही. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल, असं शिंदे म्हणाले. गावातून निघताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महायुतीत समन्वयचा अभाव नसल्याचं त्यांनी ठासून सांगितलं.