मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर महायुतीमधून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर निकालाच्या ११ दिवसांनी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी महायुती सरकारला उद्या (दि०५) डिसेंबर रोजी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले. यानंतर महायुतीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना फडणवीस म्हणाले की,” शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली आहे, त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”, असे त्यांनी म्हटले. फडणवीस यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
तसेच “उद्या तिघांचा शपथविधी होणार असून आणखी कोणते आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याची माहिती आज संध्याकाळपर्यंत देऊ. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे, पद ही तांत्रिक गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणार असून जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करण्यावर आमचा भर असणार आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.