नागपूर- मागील 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड निश्चित झाली आहे. राज्यपालांच्या निर्देशांनुसार 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, अखेर भाजपने प्रा. राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राम शिंदे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचं म्हटले आहे. आज सकाळी 10 वाजता राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी (आज) विधानपरिषद सभापतीची निवड केली जाणार आहे. भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड होणार आहे. त्यामागील राजकीय समीकरणे जाणून घेऊ.
विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपानं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी विधानपरिषदेत आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं विधानपरिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीकडं असलेलं संख्याबळ आणि विधानपरिषदेसाठी एकच अर्ज आला असल्यानं राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात आहे.
राम शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन- माजी मंत्री राम शिंदे हे मूळचे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील आहेत. ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले. यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांनी सुद्धा, 'या मतदारसंघात एक सभा घेतली असती तर चित्र बदललं असतं' असं रोहित पवारांना उघडपणे सांगितल्यानं राम शिंदे नाराज झाले होते. परंतु आता नाराज राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर वर्णी लावून भाजपाकडून पुनर्वसन केलं जात आहे.