पुणे : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक वाचायचे आहे. या पुस्तकावर किमान ५०० शब्दांचे परीक्षण किंवा पाच मिनिटांचे सादरीकरण करायचे असून त्यासाठी वाचनीय पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आहेत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच स्पर्धेतील विजेत्या परीक्षणांचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात करून स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिक प्रदान करण्यात यावे असेही सांगितले आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम १ ते १५ जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, लेखक विद्यार्थी संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील जयकर ग्रंथालय यांनी या उपक्रमासाठी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल यांना एकत्रित करून नावीन्यपूर्ण एक आगळा वेगळा प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे " पुस्तक परिक्षण पोर्टल" जयकर ग्रंथालयाचे संचालक डॉ.संजय देसले यांनी याबाबत सांगितले की, ग्रंथपाल हा महाविद्यालयाचा महत्त्वाचा घटक असून वाचनसंस्कृती रुजवण्यात् तसेच वृद्धिंगत करण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम ग्रंथपालांना एक वेगळा प्रयोग करण्याची मोठी संधी आहे.
इंटरनेट च्या युगात सर्वांच्याच मनात हा भ्रम निर्माण झाला आहे की इंटरनेट वर सर्व माहिती उपलब्ध आहे. आपण त्यांना हे सांगणे गरजेचे आहे की इंटरनेट वरची सर्वच माहिती खरी नसते खरी माहिती तुम्हाला ग्रंथालयात उपलब्ध असते.
जयकर नॉलेज सेंटर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांच्या महाविद्यालयीन ग्रंथपालांच्या समन्वयाने स्वेच्छेने ही सर्व पुस्तक परीक्षणे गोळा करण्याचा प्रकल्प घेतला आणि तो या पोर्टलवर ठेवला. ही सर्व पुस्तक परीक्षणे लोकांसाठी २४/७ विनामूल्य उपलब्ध आहेत. पुस्तक वाचन आणि पुस्तक समीक्षा लिहिणे ही निरंतर प्रक्रिया असल्याने या शासकीय मोहिमेदरम्यान हाती घेण्यात आलेला प्रकल्प या मोहिमेनंतरही सुरू राहणार आहे. यासाठी आम्ही (brlibrary.unipune.ac.in) हे पुस्तक परिक्षण पोर्टल तयार केले असून. या प्रकल्पामध्ये सहभागी सर्व ग्रंथपालांनच्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत.
यामध्ये टेक्निकल समिती जी पोर्टल वरील सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबी बघणार. एस. ओ. पी. समिती जी पुस्तक परीक्षण कशा प्रकारचे असावेत, किती शब्द मर्यादा असावी, कुठल्या प्रकारचे (उदा. वर्ड,फोटो, व्हिडिओ इ.) ठरवणारी समिती. समन्वयक समिती महाविद्यालयांमध्ये समन्वय साधून पुस्तक परीक्षण पोर्टल वर अपलोड करतील तसेच कुठले पुस्तक परीक्षण घ्यायचे किंवा नाही हे ठरणारी ही समिती. प्रमोशन व मीडिया सपोर्ट काहीतरी वेगळे करण्यासाठी तसेच उपक्रम समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सदर समिती काम करेल. अशा विविध प्रकारच्या समित्या तयार करण्यात आल्या असून सर्व समित्यांचे टेक्निकल आणि ट्रेनिंग समिती मार्फत प्रशिक्षण झाले आहे.
वरील सर्व समित्यांमध्ये (जयकर ग्रंथालयातील डॉ.नागेश लोंढे, डॉ.प्रियांका वाडेकर, डॉ. रजनी मेश्राम, तांत्रिक सहाय्यक वृषाली खिल्लारी आणि ग्रंथालयातील संपूर्ण सपोर्ट कर्मचारी टीम) तसेच (विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालयातील डॉ.विठ्ठल नायकवडी, प्रा.प्रदीप बच्छाव, प्रा.योगेश मते, डॉ.भाऊसाहेब शेळके, डॉ. नीता शिंदे, प्रा.मनीषा गायकवाड, प्रा.प्राची अरोटे, डॉ.सुनीता माने, प्रा.हेमंत भोये, प्रा.मेघना चंद्रात्रे, प्रा.भगवान गावित, डॉ.संगीता ढमढेरे राव, डॉ.प्रियांका नायकवडी, डॉ.स्वाती भडकमकर, प्रा.स्वाती मते, डॉ.मनीषा माने नवले, प्रा.योगेश डफल, प्रा.संजय आहेर, डॉ.प्रवीण घुले, प्रा.मधुकर तोगम ) इ. एकूण २५ ग्रंथपाल तसेच ८० पेक्षा जास्त ग्रंथपाल पुस्तक परीक्षण समन्वयक यांचा समावेश असून त्यांच्यामार्फत पुस्तक परीक्षण अपलोड करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. पोर्टलसाठी संपूर्ण तांत्रिक बाजू तसेच पोर्टल तयार करण्याचे काम जयकर ग्रंथालयातील सहाय्यक ग्रंथपाल डॉ.नागेश लोंढे आणि अगस्ती महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.प्रदीप बच्छाव यांचा महत्त्वाचा वाटा आहे आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच सर्व सहभागी परीक्षण कर्त्यांचे पुस्तक परीक्षण सदर पोर्टल वर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता पुस्तक परीक्षण पोर्टल (brlibrary.unipune.ac.in) सर्वांसाठी पुस्तक परिक्षण अपलोड करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक महाविद्यालय साठी एक समन्वयक दिला आहे. प्रत्येक महाविद्यालयाने त्यांना संपर्क साधून आपली पुस्तक परीक्षणे पोर्टलवर अपलोड करून घेण्याचे आवाहन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांचेकडून पुस्तक परिक्षण पोर्टल वर असलेल्या नमुण्यामध्ये तयार करून घेऊन आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल यांचेशी संपर्क साधून पुढील अपलोड करण्याची कार्यवाही करून "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमाअंतगत पुस्तकांचे व ग्रंथालयांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले आहे.अधिकच्या माहितीसाठी त्वरित (brlibrary.unipune.ac.in) पोर्टल ला तसेच आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल यांना भेट द्यावी असे त्यांनी सांगितले आहे.