सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 DIGITAL PUNE NEWS

भारताने वर्षानुवर्षे अमेरिकेचा फायदा घेतला; तरीही मोदींसोबत व्यापार करार करणार – डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

डिजिटल पुणे    05-06-2026 17:53:20

वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार संबंधांबाबत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दीर्घकाळ अमेरिकेवर जास्त आयात शुल्क लादून फायदा घेतल्याचा आरोप केला. मात्र, सध्या अमेरिका टॅरिफमधून मोठी कमाई करत असूनही भारतासोबत व्यापार करार करण्यास आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत," असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून नुकतेच अमेरिकन प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांसोबत अनेक फेऱ्यांच्या बैठका घेतल्या. दोन्ही देश तात्पुरत्या व्यापार करारावर सहमती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने चर्चेला सकारात्मक दिशा मिळाल्याचे सांगितले आहे.

मात्र, या चर्चेदरम्यान अमेरिकेने सक्तीच्या मजुरीविरोधातील उपाययोजनांच्या मुद्द्यावर काही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संभाव्य यादीत भारताचाही समावेश असून भारतीय उत्पादनांवर 12.5 टक्के अतिरिक्त शुल्क लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय वस्तू महाग होऊ शकतात. तथापि, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या आराखड्यावर सहमत झाले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या काही टॅरिफ निर्णयांवर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर कराराच्या प्रक्रियेला काही प्रमाणात विलंब झाला आहे.

व्यापार करारातील प्रमुख अडथळे अजूनही कायम आहेत. भारताला वस्त्रोद्योग, रत्न-दागिने, औषधनिर्मिती आणि कृषी उत्पादनांवरील अमेरिकेचे अतिरिक्त शुल्क कमी व्हावे अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, अमेरिकेला कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, मद्य, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ अधिक खुली हवी आहे.

विशेषतः कृषी आणि दुग्ध व्यवसायाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. अमेरिकेला आपल्या कृषी उत्पादनांची भारतातील विक्री वाढवायची आहे, तर भारताला याचा देशातील शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी काळात या चर्चांकडे दोन्ही देशांच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती