सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 जिल्हा

ठाण्यात भीषण अपघात : भरधाव बीएमडब्ल्यू डिव्हायडरवर आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, इंजिन अपघातस्थळापासून 30 मीटर दूर फेकले गेले

डिजीटल पुणे    22-06-2026 15:16:32

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ मुंबई–दिल्ली द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणारी बीएमडब्ल्यू कार डिव्हायडरवर आदळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिचे इंजिन सुमारे 30 मीटर अंतरावर जाऊन पडले.

मृतांची ओळख वांद्रे येथील योगेश नेगी (वय 26) आणि रेबेका जेकब (वय 24) अशी झाली आहे. तर कार चालवणारा आणि बीएमडब्ल्यूचा मालक अंगद याच्यावर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात पोलिसांना अपघातापूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ मिळाला असून, त्यामध्ये कारचा वेग तब्बल 250 किमी प्रतितास असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओची सत्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. भरधाव वेग आणि बेदरकार वाहनचालना हे अपघातामागील प्रमुख कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश नेगीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघेही बदलापूर (पश्चिम) येथे गेले होते. तेथून परतताना हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी मिळालेल्या बिलावरून त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम केल्याची माहिती समोर आली आहे.

द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापनासाठी उभारलेल्या काँक्रीट बॅरिकेड्सना चुकवण्याचा प्रयत्न करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळल्याचा पोलिसांना संशय आहे. धडकेनंतर कार पलटी होऊन डिव्हायडरमध्ये अडकली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही कार दोन वेळा अतिवेगाने जाताना दिसली. काही क्षणांनंतर मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आला. घटनास्थळी पोहोचल्यावर कार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसली. एक तरुणी काही अंतरावर फेकली गेली होती, तर एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि वाहनाचा प्रत्यक्ष वेग याबाबत तांत्रिक तपास केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती