पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 24 वर्षीय केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी केतन यांच्या होणाऱ्या पत्नीसह तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
गुरुवारी (18 जून) केतन यांच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस असल्याने दोघे लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. किल्ल्यावर फिरत असताना दरीच्या कडेला फोटो काढण्याच्या बहाण्याने केतन यांना उभे करण्यात आले. त्याचवेळी त्यांना दरीत ढकलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. पर्यटकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बचाव पथकाने दरीत उतरून केतन यांना बाहेर काढले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि संबंधितांच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यानंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता समोर आली. या पार्श्वभूमीवर होणारी पत्नी आणि तिच्या मित्राची चौकशी सुरू असून या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, काही वृत्तांनुसार संबंधित तरुणीला केतन अग्रवाल यांच्याशी विवाह करायचा नव्हता. त्यामुळे तिने आपल्या मित्राच्या मदतीने केतन यांना कायमचे दूर करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, केतन आणि संबंधित तरुणीचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता. कुटुंबीयांनी जयपूर येथे भव्य विवाहसोहळ्याची तयारी सुरू केली होती. यासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस आरक्षित करण्यात आल्याची तसेच पाहुण्यांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या खर्चाबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत असून चौकशीनंतरच संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.