अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उधळून लावली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत सुमारे 7 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहनासह एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर तेल्हारा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी बाला जयस्वाल याला अटक करण्यात आली असून आणखी एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच या गुटखा तस्करीमागील रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.