सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 DIGITAL PUNE NEWS

कुठे गेले तुमचे मित्र? ; सभागृहात पोहोचताच आदित्य ठाकरेंचा शोध, एकनाथ शिंदेंचा पलटवार

डिजीटल पुणे    23-06-2026 16:30:21

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक रंगली. लक्षवेधी सूचनांवरील प्रश्नांना संबंधित मंत्र्यांऐवजी इतर मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. काही वेळाने सभागृहात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधत प्रत्युत्तर दिले.

सभागृहात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या खात्यांची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे, त्या खात्यांबाबत उत्तरही संबंधित मंत्र्यांनीच द्यायला हवे. इतर मंत्र्यांकडे जबाबदारी ढकलणे योग्य नाही. तसेच, अध्यक्षांच्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेत रेकॉर्डवरील काही नोंदी हटवण्याची मागणी केली. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, विरोधक सभागृहातून बाहेर गेल्यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत पोहोचले. मंत्र्यांकडून घडलेल्या घटनांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विरोधी बाकांकडे पाहत, "कुठे गेले तुमचे मित्र? घरी गेले का?" असा टोला लगावला.

यावेळी शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना, कालच्या राजकीय घडामोडींनंतर विरोधक अस्वस्थ झाल्याचा दावा केला. तसेच, विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विविध उपरोधिक टिप्पणी करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुढील काळातही विरोधकांना राजकीय धक्के बसतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या शाब्दिक संघर्षामुळे विधानसभेतील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधकांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे पुढील अधिवेशनातही राजकीय वातावरण आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.


 Give Feedback



 जाहिराती