पुणे : लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आलेल्या तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिस तपासात केतनची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपींनी पहिल्याच प्रयत्नात केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो झाडाला अडकल्याने बचावला. त्यानंतर सियाने त्याला मिठी मारत आपणच वाचवल्याचा बनाव केल्याचा दावा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, 14 जून रोजी सिया आणि चेतन यांनी केतनला लोहगडावर नेले. त्यावेळी 'साप आला' असे सांगून त्याला दरीच्या दिशेने ढकलण्यात आले. मात्र तो झाडाला अडकल्याने बचावला. त्यानंतर सियाने केतनला मिठी मारून आपण त्याला वाचवल्याचे नाटक केले. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर 18 जून रोजी वाढदिवसाचे निमित्त करून सियाने पुन्हा केतनला लोहगडावर बोलावले. तेथे चेतनच्या मदतीने त्याला सुमारे 350 फूट खोल दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
मृत्यूनंतरही सियाच्या वागणुकीत कोणतेही दुःख दिसून न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर केतनची बहीण संजना हिने सियाला लोहगडावरील घटनांबाबत अनेक प्रश्न विचारले. तिच्या विसंगत उत्तरांमुळे संशय अधिक बळावला आणि कुटुंबीयांनी पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली.
तपासादरम्यान सिया आणि चेतन यांच्यात गेल्या वर्षभरात दोन हजारांहून अधिक फोन कॉल आणि शेकडो तास संवाद झाल्याचे समोर आले. तसेच, घटनेच्या दिवशी चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानात ठेवून कर्मचाऱ्याचा फोन सोबत घेतल्यामुळे त्याचे लोकेशन दिशाभूल करणारे असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विशाल अग्रवाल यांनी, "लग्न करायचे नसेल तर नकार दिला असता, आम्ही ते मान्य केले असते. मात्र इतके टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, हा प्रश्न आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागावा," अशी मागणी केली आहे.