शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत निकृष्ट दर्जाचा प्रसाद विकणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील पेढा विक्री केंद्रे आणि उत्पादन युनिट्सवर टाकलेल्या धाडीत तब्बल 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला. जप्त केलेला पेढा नियमानुसार नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली दर्जाहीन पेढ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
आयुक्तांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर विभागाच्या पथकाने शिर्डीत विशेष तपासणी मोहीम राबवली. गेल्या पंधरा दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई असून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध दुकाने आणि उत्पादन केंद्रांची तपासणी केली. या दरम्यान सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा 650 किलोहून अधिक निकृष्ट पेढा जप्त करण्यात आला आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या धडक कारवाईमुळे प्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त अथवा निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शिर्डी परिसरात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळात तपासणी मोहिमा आणखी तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.