सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रसादाच्या नावाखाली सुरू होता आरोग्याशी खेळ! शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांवर एफडीएचा छापा; 650 किलो प्रसाद जप्त, लाखोंचा साठा नष्ट
  • प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक; शिर्डीत 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर ; अभिनेत्री हिना खानची संतप्त प्रतिक्रिया; सिया गोयलला थेट सवाल, ‘सत्य सांगणं इतकं कठीण होतं का?’
  • नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार; ‘फाशीच योग्य’ असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद
 जिल्हा

नागपूर, विदर्भ आणि मध्यभारताच्या विकासाचे इंजिन म्हणून नागपूर विमानतळ नावारूपाला येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजीटल पुणे    25-06-2026 18:23:19

नागपूर : नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात आयोजित विमानतळ हस्तांतरण सोहळयात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नवनवीन विमानतळ उभारले जात असताना नागपूर विमानतळ मोठे व सुंदर करण्याचा आम्ही संकल्प केला. २०१८ मध्ये यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. २०१९ मध्ये जीएमआर कंपनी पात्र ठरली होती. मात्र या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि अखेर सकारात्मक निर्णय आला. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला व केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आज रीतसरपणे या विमानतळाच्या आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्यादृष्टीने जीएमआर कंपनीला विमानतळ हस्तांतरण करण्यात आले आहे.

या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणांमुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या एक वर्षात या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाला येथील सौंदर्य आणि सुविधेत अभूतपूर्व बदल दिसावा असे काम व्हावे. तसेच २०२९ पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाकडून मिहान आणि एमआयडीसी अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर व परिसर आणि विदर्भात होत असलेला उद्योग क्षेत्राचा विकास शेजारील तेलंगणा, छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांनाही मोठा फायदा होऊन या भागाच्या आर्थिक विकासासाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

विमानतळ हस्तांतरण हा नागपूरच्या जनतेसाठी ऐतिहासिक क्षण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जीएमआर कंपनीला हस्तांतरण होणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूरसह मध्य भारतातील प्रवाशांना उत्तम हवाई वाहतुकीसोबतच कार्गोहबच्या माध्यमातून निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. नागपूर हे मध्यवर्ती शहर आहेच पण देशाच्या चारही मेट्रो शहरांसाठी केवळ तासांत संवाद पोहोचणे येथून शक्य आहे. नागपूर हे लॉजिस्टिक कॅपिटल हब म्हणूनही ओळखले जात असल्यामुळे विमानतळाचा विकास तसेच दुसऱ्या धावपट्टीची आवश्यकता या हस्तांतरणामुळे पूर्ण होणार आहे. नागपूर शहराच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्प असून ३५० पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे. त्यामुळे देश व विदेशातील पर्यटक येथे भेटी देतात. या पर्यटनाला विमानतळामुळे चालना मिळणार आहे. नागपूर सभोवताली मोठ्या प्रमाणात खनिज संपदा उपलब्ध आहे. त्यामुळे येथील खनिज आधारित उद्योगाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विमानतळ हस्तांतरणामुळे विदर्भाच्या विकासाचा टेक ऑफ – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

केंद्रीय नागरी  विमान वाहतूक मंत्री श्री किंजरपू राममोहन नायडू यांनी नागपूर विमानतळाचे केवळ हस्तांतरणच होणार नसून हा क्षण विदर्भाच्या विकासाचा टेकऑफ असल्याचे सांगितले. विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र न राहता उद्योग विकासाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. प्रवासी वाहतुकी सोबतच येथे कार्गो हब होणार असल्यामुळे विदर्भाच्या विकासाचे नवे दालन या विमानतळाच्या माध्यमातून खुले होणार आहे.विमानतळाचा विकास करताना सध्याची वर्षाला ३० लाख प्रवासी क्षमता वाढून येत्या काळात या विमानतळावर ६० लाख प्रवासी क्षमता होईल असा विश्वास व्यक्त करून ३ कोटी प्रवाशी क्षमतेचे उद्दिष्ट गाठले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरातून दुबई, सिंगापूरसह युरोप, अमेरिका तसेच जगातील प्रमुख देशांना थेट जोडणारी विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल ,माया इवनाते आणि श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री परिणय फुके, संजय मेश्राम, समीर मेघे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जीएमआरचे व्यावसायिक चेअरमन जी.बी.एस.राजू,मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते.तत्पूर्वी, जीएमआरचे व्यावसायिक चेअरमन जी.बी.एस.राजू आणि मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू ,केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाचे हस्तांतरण केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बोध चिन्हाचे अनावरण झाले. नागरी विमान वाहतूक मंत्री श्री किंजरपू राममोहन नायडू यांच्या हस्ते जीएमआर नागपूर विमानतळ संकेत स्थळाचे अनावरण झाले.


 Give Feedback



 जाहिराती