पुणे : पुण्यातील उद्योजकाचा मुलगा केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सिया गोयल हिच्या कुटुंबीयांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. मुलीच्या अटकेनंतर झालेल्या मानसिक धक्क्यामुळे सियाचे वडील प्रवीण गोयल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातून माध्यमांशी बोलताना सियाची आई पूजा गोयल यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. "या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मुलगी दोषी आढळली तरी तिलाही कोणतीही सवलत देऊ नये," असे त्या म्हणाल्या. आपल्या मुलीच्या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांकडून जर याआधी सियाच्या वर्तनाबाबत माहिती मिळाली असती, तर आम्ही मुलीला समज देण्याचा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता.
प्रवीण गोयल यांनी पुढे स्पष्ट केले की, या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरी याला त्यांनी कधीही भेटले नव्हते. "मी त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो आमच्या घरी कधी आला नव्हता आणि सियानेही त्याच्याबद्दल आम्हाला कधी काही सांगितले नव्हते," असे त्यांनी सांगितले.
केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाबाबत बोलताना त्यांनी दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. "ते अतिशय चांगले आणि संस्कारी लोक आहेत. या घटनेमुळे आम्ही एका चांगल्या कुटुंबाशी नाते जोडण्याची संधी गमावली आणि एका तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यापेक्षा अधिक काही बोलण्याची माझी इच्छा नाही," असे प्रवीण गोयल यांनी नमूद केले.
दरम्यान, 18 जून रोजी लोहगड परिसरात केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस तपासात हे हत्या प्रकरण असल्याचे समोर आले. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.