पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी नुकतीच सखोल चौकशी केली. त्यानंतर आता सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली असून, त्याच्या जबाबामुळे तपासाला महत्त्वाचे वळण मिळाल्याचे समोर आले आहे.
भावाच्या जबाबामुळे सियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
पोलिस तपासात सियाने केतनशी लग्न करायचे नसल्याचे आपण कुटुंबीयांना सांगितल्याचा दावा केला होता. मात्र, चौकशीदरम्यान तिचा भाऊ साहिल गोयलने हा दावा फेटाळून लावला. सियाने कधीही मला किंवा कुटुंबातील कोणालाही केतनशी लग्न नको असल्याचे सांगितले नव्हते, असे त्याने पोलिसांना स्पष्ट केले. तसेच, तिने याबाबत आधी सांगितले असते तर कुटुंबीयांनी हे लग्न पुढे नेलेच नसते, असेही त्याने नमूद केले.
क्रिकेटच्या मैदानावरून सुरू झालेली ओळख प्रेमसंबंधात
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल गोयल आणि चेतन चौधरी एकत्र क्रिकेट खेळायचे. त्याच माध्यमातून सियाची चेतनशी ओळख झाली. नंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट झाले. पोलिसांच्या तपासात गेल्या काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात सुमारे 2,400 फोन कॉल झाल्याचे, तर दोघांमधील संभाषणाचा कालावधी 238 तासांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
केतनबद्दल नाराजीची कारणेही तपासात समोर
तपासादरम्यान सियाला केतनचे व्यक्तिमत्त्व पसंत नसल्याची माहितीही समोर आली आहे. केतन केसांचा टोप वापरत होता आणि बोलताना अडखळत होता. या गोष्टींमुळे ती त्याच्याबद्दल नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तपास यंत्रणांच्या मते, सियाचे चेतनवर असलेले प्रेम हेच या संपूर्ण प्रकरणामागील प्रमुख कारण असल्याचा संशय आहे.
घटनास्थळी नेऊन केली पुनर्रचना
दरम्यान, पोलिसांनी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना लोहगड परिसरात नेऊन घटनाक्रमाची पुनर्रचना केली. त्यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला, घटनास्थळी नेमके काय घडले, याबाबत दोघांकडून माहिती घेण्यात आली. तसेच, तपासाचा भाग म्हणून आता सियाच्या आई-वडिलांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
तपासानुसार, 14 जून रोजीही सियाने केतनला लोहगडावर नेले होते. मात्र, त्यावेळी कथित कट पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर 18 जून रोजी ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनला पुन्हा लोहगडावर बोलावण्यात आले. याचवेळी चेतन चौधरी आधीच तेथे पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन मागून आला आणि दोघांनी मिळून त्याला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेत केतन अग्रवालचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.