पुणे : जलसाक्षरता, नदी पुनरुज्जीवन, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. सुमंत पांडे यांची यंदाच्या 'वसंतराव नाईक जलसंवर्धन पुरस्कारासाठी' निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.
यंदा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'कृषीदिन' कार्यक्रमात दि.१ जुलै २०२६ रोजी हा सन्मान यशवंतराव चव्हाण सेंटर (मुंबई)प्रदान केला जाणार आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रु. ३५ हजार रोख रकमेचा पुरस्कार डॉ. पांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. सुमंत पांडे यांनी गेल्या अनेक दशकांपासून राज्यातील जलसंधारण, नदी अभ्यास, जलसाक्षरता, लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन, पाणलोट विकास, जलसुरक्षा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे.
जलसुरक्षा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात सातत्याने कार्य
डॉ. सुमंत नरसिंगराव पांडे हे जलसंधारण, नदी पुनरुज्जीवन व लोकसहभागावर आधारित जलव्यवस्थापन क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात तीन दशकांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या यशदा येथे जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक म्हणून कार्य.ते सध्या नदीकी पाठशाला फाउंडेशनचे संस्थापक-संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते दैनिक ॲग्रोवनमध्ये गेल्या चार वर्षांपासून "दिशा ग्रामविकासाची" हे लोकप्रिय सदर नियमित लिहित आहेत. जैवविविधतेवरील "ज जैवविविधतेचा" हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी काजळी (रत्नागिरी), मन्याड व लेंडी (नांदेड), वेळ नदी (शिरूर, पुणे), ढेकू (छत्रपती संभाजीनगर), सिंदफणा (बीड) आणि उदई (धडगाव, नंदुरबार) यांसह राज्यातील अनेक नदीखोऱ्यांत प्रत्यक्ष काम केले आहे. पाण्याच्या टंचाईचा सूक्ष्म अभ्यास, स्थानिक ज्ञानाचा उपयोग आणि लोकसहभागातून शाश्वत उपाययोजना उभारणे हा त्यांच्या कार्याचा गाभा असून, पाण्याअभावी होणारे स्थलांतर कमी करून जलसुरक्षित गावे घडविणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आहे.