मुंबई : NEET पेपरफुटीच्या वादातून देश सावरत असतानाच महाराष्ट्रात आणखी एका मोठ्या परीक्षा घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ चा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६ लाख १२६ उमेदवारांवर थेट परिणाम झाला आहे.
भिवंडीत पोलिसांची धाड, तपासात उघड झाला प्रकार
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शनिवारी पहाटे भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. पडताळणीदरम्यान संबंधितांकडे असलेले काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
परीक्षा परिषदेकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने घेणे हेच प्राधान्य असल्याने सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. नवीन तारखेची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत नवीन परीक्षा तारीख जाहीर करण्यात येईल. राज्यातील ३७ शहरांतील १,०२८ परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.
रोहिणी खडसे यांचा सरकारवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "टीईटीचा पेपर फुटणे म्हणजे केवळ परीक्षेतील गैरप्रकार नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घातलेला दरोडा आहे. प्रत्येक वेळी पेपरफुटी होते, चौकशीची घोषणा होते; मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कोण?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, "जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?" असा टोला त्यांनी सरकारला लगावला