पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या दैनिक गुन्हे अहवालानुसार,आज सकाळी १० ते २४ तासांच्या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, चोरी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीसह एकूण सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
सर्वात मोठी घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सायबर भामट्यांनी ऑनलाइन माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवत तब्बल १७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. खडकी, चतु:श्रृंगी आणि कोंढवा परिसरातही घरफोडी आणि चोरीच्या स्वतंत्र घटना घडल्या असून रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला.दरम्यान, कोथरूडमध्ये जुन्या वादातून एका व्यक्तीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व घटनांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत. सलग घडणाऱ्या चोरी आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमुळे पुणेकरांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
याशिवाय चतुःश्रृंगी, खडकी (शिवाजीनगर) आणि कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या स्वतंत्र घटना घडल्या असून रोख रक्कम, दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत.या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.