मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (३० जून) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य विस्तारात महाराष्ट्रातून शिवसेनेला (शिंदे गट) आणखी मोठे प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा असून, डॉ. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'ऑपरेशन टायगर'नंतर वाढलेल्या खासदार संख्येमुळे शिंदे गटाचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅबिनेटसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यमंत्रीपदासाठी परभणीचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले खासदार संजय उर्फ 'बंडू' जाधव यांचे नाव चर्चेत आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या खासदारांपैकी त्यांना संधी मिळू शकते, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून दिली जात आहे.
प्रतापराव जाधव यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह?
सध्या आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबाबत केंद्रीय नेतृत्व समाधानी नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
भाजप नेतृत्वाकडून श्रीकांत शिंदेंना पसंती?
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही अनुकूलता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या वाढलेल्या खासदार संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
तिरुपती दर्शनानंतर चर्चांना उधाण
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी सुमारे चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतल्याने त्यांच्या नावांभोवतीच्या राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि शिंदे गटाच्या वाढलेल्या खासदार संख्येमुळे केंद्रात शिवसेनेला अतिरिक्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय मंत्रिमंडळ विस्ताराच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.