पुणे : राज्यभरात संतापाची लाट उसळलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय दिला. ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवत विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा गुन्हा "दुर्मिळातील दुर्मिळ" (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोर शिक्षा जाहीर केली.
निकाल सुनावताना न्यायालयाने आरोपीने अल्पवयीन, असहाय्य मुलीवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केल्याचे निरीक्षण नोंदवले. या गुन्ह्यामुळे समाजमन हादरले असून आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा आधार घेत फाशीची मागणी केली होती. न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले.
न्यायालयाने तपास यंत्रणेच्या कार्याचेही विशेष कौतुक केले. गुन्ह्यानंतर अवघ्या १६ दिवसांत सुमारे १,२०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि दैनंदिन सुनावणीद्वारे अल्पावधीत खटल्याचा निकाल देण्यात आला.
शिक्षा जाहीर होताच न्यायालयात उपस्थित पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. मात्र आरोपी भीमराव कांबळेने निकालानंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
प्रकरणाचा थोडक्यात घटनाक्रम
१ मे २०२६: नसरापूर येथून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता; नंतर मृतावस्थेत आढळली.
२ मे: आरोपीला ताब्यात घेऊन अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल.
१६ मे: १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल.
२१ मेपासून: विशेष न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू.
जून २०२६: साक्षीदार, वैज्ञानिक पुरावे आणि अंतिम युक्तिवाद पूर्ण.
२९ जून २०२६: न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.