पुणे : राज्यभरात संतापाची लाट उसळलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय दिला. ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवत विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा गुन्हा "दुर्मिळातील दुर्मिळ" (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोर शिक्षा जाहीर केली.
नसरापूर येथील अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला अतिशय जलद गतीने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल माननीय न्यायालयाचे मनःपूर्वक आभार !
या निर्णयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, गुन्हा जितका भयावह असेल तितक्याच कठोर आणि वेगवान पद्धतीने न्यायही मिळू शकतो. हा निर्णय केवळ एका आरोपीला झालेली शिक्षा नसून, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि समाजात विकृती पसरवणाऱ्या प्रवृत्तींना दिलेला स्पष्ट इशारा आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याचा वेग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला. सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडत हा गुन्हा "दुर्मिळातील दुर्मिळ" असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले आणि अल्पावधीत न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.वेगवान न्याय हा पीडितेला आणि समाजाला दिलासा देणारा असतो. अशा गुन्ह्यांबाबत कायद्याचा धाक निर्माण करणारा हा निर्णय भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.