पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या 59 दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. निकाल जाहीर होताच न्यायालयात उपस्थित पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सरकार, पोलीस आणि सरकारी वकिलांचे आभार मानले. "सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले. सर्वांनी कायद्यावर विश्वास ठेवावा," असे ते म्हणाले. तसेच आरोपीचे वय लक्षात घेता त्याने केलेले कृत्य अत्यंत लज्जास्पद असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
न्यायालयाने हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ रेअर' स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीने केलेल्या अत्याचारातील क्रूरता, पीडितेचे अल्पवय, वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास यांचा विचार करून फाशीची शिक्षा सुनावली. तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला देत फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. न्यायालयाने तपास पथक, सरकारी वकील, फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर आणि सायबर तज्ज्ञांच्या कामाचे विशेष कौतुक करत या प्रकरणातील तपास आदर्शवत असल्याचे नमूद केले.
दरम्यान, 1 मे रोजी नसरापूर येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विशेष तपास पथकाने अवघ्या 16 दिवसांत सुमारे 1,200 पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर फास्टट्रॅक पद्धतीने खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि अखेर न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.