सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
  • नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
  • नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
  • नसरापूरच्या नराधमाला फाशी, एकनाथ शिंदे म्हणाले, केतन अग्रवाल केसही फास्टट्रॅकवर घेऊ!
  • नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल; भीमराव कांबळेला फाशी, 'हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा' म्हणत न्यायालयाचा कडक निर्णय
 जिल्हा

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत – मंत्री नितेश राणे

डिजीटल पुणे    29-06-2026 16:15:54

मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून १५ ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

यापूर्वी राज्याच्या जलधी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी होती. पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी मासेमारी रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समिती तसेच राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. या समित्यांनीही बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा अभिप्राय दिला.

शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल. तसेच माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानीही टाळता येणार आहे.

दरम्यान, राज्यात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती