सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 DIGITAL PUNE NEWS

शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का; सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेकडून अर्ज

डिजीटल पुणे    30-06-2026 15:56:55

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी काही नेते आणि लोकप्रतिनिधी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "ज्यांना पक्षाने सर्व काही दिले, तेच सोडून जात आहेत. मात्र कुणी गेल्याने आमच्या संघटनेवर परिणाम होणार नाही. वरळी आणि शिवडी हा आमचा बालेकिल्ला असून जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत कायम राहील."

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी शिंदे गटाच्या नेत्यांकडून संपर्क सुरू होता. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची संधी आणि भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. वरळी मतदारसंघातील त्यांची मजबूत संघटनात्मक पकड आणि कामगार संघटनांमधील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, उपसभापतीपद स्वीकारणाऱ्या सदस्यांना दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी कायद्यातील विशेष तरतुदींमुळे अपात्रतेपासून संरक्षण मिळते. त्यामुळे सचिन अहिर यांच्या या निर्णयावर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनीही या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, "सचिन अहिर हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी कोणतेही पक्षांतर केलेले नाही, तर शिवसेनेतच प्रवेश केला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा शिवसैनिकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारा आहे," असे म्हटले.

सचिन अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले असून त्यांनी राज्यात मंत्रीपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. आता शिंदे शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती