मुंबई : भिवंडीतील वीज वितरण फ्रँचायझी मॉडेल हे राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले असून, पूर्वी १६ तास उपलब्ध असलेली वीज आता २३ तास ५६ मिनिटांपर्यंत पोहोचली आहे. घरगुती मीटरवर पॉवर लूम चालवल्यामुळे अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. यावर तांत्रिक बाबी बाजूला ठेवून, ग्राहकांना दिलासा देणारा नवीन मार्ग किंवा योजना आखली जाईल. ही योजनाही एमईआरसीच्या मंजुरीसाठी सादर केली जाईल, वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात भिवंडीतील वीज वितरण व्यवस्थेबाबत सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भिवंडीतील वीज वितरण फ्रॅंचायजी मॉडेल राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. यामुळे वीज वितरण हानी ४५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे खासगीकरण आणि फ्रँचायझी मॉडेल यात फरक आहे. फ्रँचायझी मॉडेलमध्ये कंपनीची मालकी कायम असते आणि वीज दर हे एमईआरसी द्वारेच ठरवले जातात. त्यामुळे फ्रँचायझी चालक मनमानी दराने वीज विक्री करू शकत नाहीत. भिवंडीतील वितरण हानीमध्ये सुधारणा झाली असून पूर्वी ४५ टक्के असलेली हानी आता १० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच वीज बिल वसुली ६५-६६ टक्क्यांवरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीज निर्मितीसाठी मागणी करण्यात आलेल्या ११०% स्कीमबाबत एमईआरसी. कडे प्रस्ताव पाठवून, त्यांच्या मान्यतेने ही योजना पुन्हा राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.
तसेच भिवंडीतील फ्रँचायझीचा करार संपल्यानंतर पुढील धोरण काय असावे, याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीचे अवलोकन करून गुणवत्तेच्या आधारावर घेतला जाईल, ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी ओटीएस आणि पॉवर लूमच्या अडचणी सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.