पुणे : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम नोंदवत 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. अल्प बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह परदेशातही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. या यशानंतर अभिनेता प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
'देऊळ बंद 2'मध्ये छोटेखानी पण प्रभावी भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या यशाचा आनंद व्यक्त केला. "100 कोटींचा टप्पा गाठणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. प्रवीण तरडे यांचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या सकारात्मक वातावरणाचाही उल्लेख केला. 'राजा शिवाजी', 'तुंबाडची मंजुळा' आणि 'घबाडकुंड' या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगत, "मराठी सिनेमासाठी हे निश्चितच चांगले दिवस आहेत," असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2'साठी घेतलेल्या मेहनतीचाही प्रसाद ओक यांनी विशेष उल्लेख केला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या अडचणी, हवामानामुळे झालेलं नुकसान आणि त्यातूनही त्यांनी न डगमगता केलेले काम जवळून पाहिल्याचे सांगत, त्यांच्या चिकाटी आणि समर्पणाचे त्यांनी कौतुक केले.
तसेच, "आमच्या पिढीतील सातत्याने यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये प्रवीण तरडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 'धर्मवीर'पासून त्यांनी प्रत्येक चित्रपटासाठी घेतलेली मेहनत पाहिली आहे. 'देऊळ बंद 2'साठीही त्यांनी तितकीच जिद्द आणि प्रामाणिकपणा दाखवला. त्यांच्या या यशासाठी त्यांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन," अशा शब्दांत प्रसाद ओक यांनी भावना व्यक्त केल्या.