सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
 शहर

जीविधा आयोजित ‘डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाले’ला प्रारंभ ;डॉ.हेमा साने यांच्या लेखनात प्रतिमासृष्टी चे वैभव: डॉ. मंदार दातार

डिजिटल पुणे    02-07-2026 11:02:24

पुणे : जीविधा संस्थेतर्फे १८ व्या हिरवाई महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाले’ला आज १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात प्रारंभ झाला. पर्यावरण, संस्कृती आणि निसर्ग या विषयांवर आधारित या व्याख्यानमालेचा पहिला दिवस पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे पार पडला.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी डॉ. मंदार दातार यांनी ‘डॉ. हेमा साने लिहायच्या तेंव्हा…’ या विषयावर व्याख्यान देत डॉ. हेमा साने यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, वनस्पतीशास्त्रातील योगदान, लेखनशैली आणि पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनाचा वेध घेतला. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी स्वागत केले.


 डॉ. मंदार दातार यांनी डॉ.हेमा साने यांच्या लेखनातील वेचे वाचून दाखवले.ते म्हणाले,'मारुती चितमपल्ली, माधवराव गाडगीळ यांनी निसर्गविषयक लेखन मराठीत केले.प्रतिमासृष्टी चे वैभव डॉ.हेमा साने यांच्या लेखनात आढळून येते. विजेशिवाय राहणाऱ्या साने यांनी समई, कंदील च्या प्रकाशात केलेल्या लेखनात त्यांची शांतता उमटते. त्यांचे लेखन झऱ्यासारखे आहे. वनस्पती शास्त्रातील तांत्रिक भाषा, संस्कृतोद्भव मराठी, गोष्टी वेल्हाळपण यांचा मिलाफ त्यांच्या लेखनात झालेला दिसतो. चंदन, पारिजात अशा परिचितांचा परिचय करून देताना त्यांच्या शैलीला बहर आलेला दिसतो'.


व्याख्यानमालेतील पुढील व्याख्याने गुरुवार, दि. २ जुलै रोजी डॉ. महेश शिंदीकर यांचे ‘आजही साधं राहता येतं…’ आणि शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी डॉ. राहुल देशपांडे यांचे ‘जाऊ देवाचिया गावा…’ या विषयांवर होणार आहेत. ही दोन्ही व्याख्याने सायंकाळी ६.३० वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहेत.
मागील वर्षी दिवंगत झालेल्या डॉ. हेमा साने या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका असून इंडॉलॉजी हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. त्यांची अत्यंत साधी, पर्यावरणस्नेही राहणी आणि निसर्गसंवर्धनासाठीची बांधिलकी यांची आठवण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

स्थानिक देशी वनस्पतींच्या लागवडीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने जीविधा संस्थेतर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी हिरवाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे १८ वे वर्ष असून उर्वरित दोन व्याख्यानांचा पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती