सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
  • तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
 विश्लेषण

पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

डिजिटल पुणे    02-07-2026 11:37:44

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्यानंतर अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम असून लोणावळ्यासह मावळ, जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. गुरुवारीही शहरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ जुलैपर्यंत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पाऊस

पर्यटननगरी लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५८६ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत २,०६१ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा अद्यापही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याचे चित्र आहे.

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता असून कोकणात मुसळधार, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई परिसरात रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी १५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा

तळकोकणात रात्रभर जोरदार पाऊस सुरू असून आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने सर्व बंदरांवर इशाऱ्याचा बावटा फडकावण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरातील माडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती