मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन्मान हॉटेलजवळ खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल काम सुरू असल्याने मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. याचवेळी मोबाईलवर बोलत जात असलेले अस्लम अन्सारी हे उघड्या मॅनहोलमध्ये पडले. घटनेनंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधादरम्यान घटनास्थळी त्यांची छत्री आणि चप्पल आढळून आली. मात्र, पावसाच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या शोधकार्यानंतर मॅनहोलमधून अस्लम अन्सारी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत पावसाळ्यादरम्यान उघडे मॅनहोल, रस्त्यांवरील खड्डे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वारंवार जीवघेण्या घटना घडत असल्याचा आरोप नेटीझन्स आणि स्थानिकांकडून केला जात आहे. अशा निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी जाणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत साकीनाका येथील दुर्घटनेचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आमदार दिलीप लांडे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पालिकेच्या कामकाजातील हलगर्जीपणावर टीका करत चौकशीची मागणी केली आहे.