पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी खुनाचा कट त्यांच्या एका मित्रासोबत आधीच चर्चा केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील एका तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा बीडचा असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून तो चेतनच्या संपर्कात होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून ठार मारण्याच्या कथित कटाबाबत त्याच्याशी चर्चा केली होती. तसेच त्यालाही १८ जून रोजी लोहगडावर येण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र, तो त्या दिवशी गडावर गेला नव्हता.
पोलिस चौकशीत या तरुणाने महत्त्वाचा दावा केला आहे. सिया आणि चेतन यांना आपण "असे टोकाचे पाऊल उचलू नका, त्याचे गंभीर परिणाम होतील," असा सल्ला दिल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच, केतनच्या मृत्यूनंतर चेतन सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची आणि सियानेही त्याच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या तरुणाला कथित कटाची माहिती असतानाही त्याने पोलिसांना याबाबत पूर्वी माहिती का दिली नाही, याचाही तपास सुरू आहे. गुन्ह्याची माहिती दडवली का, तसेच त्याची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय होती, याबाबत पुणे ग्रामीण पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या नव्या घडामोडींमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.
सिया गोयलच्या कथित हावभावांचा व्हिडिओ चर्चेत
या प्रकरणात आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. तपासासाठी सियाला तिच्या पुण्यातील निवासस्थानी नेण्यात आले असताना बाहेर पडताना तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर कथित आक्षेपार्ह हावभाव केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, या व्हिडिओचीही चर्चा सुरू आहे.