ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण आणि धावपळ यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्याचबरोबर त्यांना तीव्र अशक्तपणाही जाणवत होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही त्यांच्या प्रकृतीमुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमात धुळे येथील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशाची घोषणा होणार होती. मात्र, शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून ठाकरे गटातील काही खासदार आणि विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या राजकीय हालचालींसह दिल्लीच्या वारंवार होणाऱ्या दौऱ्यांमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर कामाचा मोठा ताण होता. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शिवसेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही गंभीर चिंता करण्याचे कारण नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती देण्यात येत आहे.