सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
  • तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
 विश्लेषण

मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; यलो मेट्रोची सेवा खंडित, अनेक भाग जलमय,प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

डिजिटल पुणे    04-07-2026 13:07:07

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईत शनिवारी (4 जुलै) मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले आहे. अवघ्या एका तासात पश्चिम उपनगरांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यलो मेट्रो सेवा बंद

मुसळधार पावसाचा फटका मुंबई मेट्रोलाही बसला आहे. मेट्रो मार्ग २अ (यलो लाईन) वर कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वीजवाहिनी तुटल्याने मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत मुंबईतील सर्व महापालिका आणि इतर संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर केली आहे. सकाळच्या सत्रासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

तीन तासांत दमदार पाऊस

सकाळी 8.30 ते 11.30 या तीन तासांच्या कालावधीत कुलाबा येथे 29 मिमी, तर सांताक्रूज येथे 48.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वसई-विरारमध्ये प्रशासन सतर्क

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विरारमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रवास

विरार पश्चिमेतील नवीन कॉलेज परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे विरार रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता जलमय झाला असून नागरिकांना पायी, दुचाकी किंवा रिक्षाने प्रवास करणे अशक्य झाले आहे. अनेक प्रवाशांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्थानकापर्यंत पोहोचावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिकांनी साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती