ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, प्रकृतीत सुधारणा होत असल्याने शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सततची धावपळ, विविध राजकीय कार्यक्रम आणि पावसाळी अधिवेशनातील व्यस्त दिनक्रम यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणून त्यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. प्रकृती खालावल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल झाले.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांची प्रकृती चिंताजनक नसून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.