पुणे : माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "चंद्रशेखर : विचार आणि सद्यस्थिती" या विषयावरील परिसंवाद रविवारी सायंकाळी (दि. ५ जुलै) एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि चंद्रशेखर यांचे सहकारी अरुणकुमार श्रीवास्तव होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार दानिश अली, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि शेतकरी नेते दिलीप (तात्या) पाटील, कमलताई पायगुडे उपस्थित होते. वक्त्यांनी चंद्रशेखर यांच्या राजकीय विचारांचा, लोकशाही मूल्यांचा आणि आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीतील त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेचा सखोल उहापोह केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झेलम परांजपे यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखविण्यात आला.रघुनाथ ससाणे यांनी सूत्रसंचालन केले.संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.संदेश दिवेकर,अन्वर राजन, दत्ता पाकिरे, बी आर माडगूळकर, साधना शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अरुणकुमार श्रीवास्तव यांनी चंद्रशेखर यांच्या वैचारिक वारशाचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या भारत यात्रेने देशातील सामाजिक वास्तव, ग्रामीण भारत आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज दिला, असे मत व्यक्त केले. महात्मा गांधी, लोहिया यांच्या नंतर चंद्रशेखर यांनी देशातील युवा पिढीवर प्रेम केले आणि दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात कामाचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य होते.आज असे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे.समाजवादी विचार पुढे नेण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.येणाऱ्या पिढीसाठी समाजवादी विचार आणि उपक्रम देण्याची गरज आहे.जन्म शताब्दी निमित्त एक हजार कार्यक्रमांचा संकल्प करण्यात आल्याची माहिती दिली.
उल्हास पवार म्हणाले, चंद्रशेखर यांनी तरुण तुर्क म्हणून परखड, बंडखोर भूमिका मांडल्या आणि देशहित जपले. संसदीय कामकाजाला प्रतिष्ठा दिली.गरीबांसाठी, समाजवादासाठी लढा दिला.आज असे नेतृत्व पहायला मिळत नाही. जनता पक्षाच्या काळात संघ जो सत्तेत घुसला, तो खाली उतरायला तयार नाही. ही मंडळी शिरजोर झाली आहेत. माध्यमे गुलाम झाली आहेत. जनता नर्मदेच्या गोट्यासारखी शांत बसून आहे. अशा वेळी चंद्रशेखर यांची वैचारिक बैठक आठवते.नितीशकुमार यांच्यासारखी तडजोड चंद्रशेखर यांनी केली नसती.या कार्यक्रमात चंद्रशेखर यांच्या ऐतिहासिक भारत यात्रा पदयात्रेत सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील पदयात्रींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमास विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.