सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 शहर

विजय पटवर्धन फाऊंडेशनचा 'पडद्यामागचा सुपरस्टार' कार्यक्रम ;पडद्यामागच्या कलाकारांचा कौतुक सोहळा ७ जुलै रोजी

डिजिटल पुणे    06-07-2026 11:57:09

पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी 'क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंगभूमीवर पडद्यामागे राहून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा मंगळवार,दि.७ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे  होणार आहे.या सोहळ्याला अभिनेते अंगद म्हसकर, तेजस बर्वे, ‘देऊळबंद २’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे, तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित राहणार आहेत.या उपक्रमाला कपिल जोशी,प्रसाद शिवरकर,तेजस देवधर,उल्लेश खंदारे आणि सुलेखा तळवलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गजेंद्र वाणी( प्रकाशयोजना सहाय्य ),आदित्य दुदम(संगीत संयोजन),मंदार बापट(व्यवस्थापक ),कमलेश बिचे(रंगभूषाकार), बबन चव्हाण(प्रॉपर्टी ),नजीम शेख(कपडेपट ),संदिप देशमुख(नेपथ्य निर्माण),संजय विसाळ(भोजन व्यवस्था ),वैशाली पाटेकर( केशभूषा),संजय चौखंडे(चालक) या पडद्यामागच्या कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सोहळ्यानंतर पक्ष्यांच्या आवाजाचा अर्थ सांगणारा आणि त्यावर आधारित गाण्यांचा "पहल" हा सुरेल कार्यक्रम सादर होणार  आहे.रंगभूमीला आकार देणाऱ्या, नाटक अधिक प्रभावी करण्यासाठी पडद्यामागे निरलसपणे योगदान देणाऱ्या या सर्व कलाकारांचा गौरव करण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रंगमंचावर नाटक यशस्वी होण्यासाठी प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, केशभूषा, संगीत संयोजन, प्रॉपर्टी, कपडेपट, व्यवस्थापन, भोजन व्यवस्था आणि वाहन व्यवस्था अशा अनेक विभागांतील कलाकार आणि तंत्रज्ञ शांतपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करत असतात. मात्र, अनेकदा त्यांचे कार्य पडद्यामागेच राहते. अशा पडद्यामागच्या कलाकारांना सन्मानपूर्वक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने हा आगळावेगळा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती