पुणे: पं. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रुती संगीत निकेतन(अहिल्यानगर) आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळ प्रस्तुत संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित संगीत 'ऊस डोंगा परी’ या दोन अंकी संगीत नाटकाचा विशेष प्रयोग शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. संत चोखामेळा यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक समतेच्या संदेशाचा संगीत, अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून प्रभावी आविष्कार या नाटकातून सादर करण्यात येणार आहे.ज्येष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी हे या प्रयोगासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रवेश विनामूल्य आहे.
या संगीत नाटकाचे लेखन आणि संगीत पं. विकास कशाळकर यांचे असून दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे. तर नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी कल्याणी कामतकर यांनी सांभाळली आहे. शौनक कुलकर्णी, डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, मोहित मेहेर, संकेत शाह, विशाल काशीद, श्रावण शिंदे, संगीता देऊळगांवकर, अनिकेत देऊळगांवकर,सौ.अनुजा कुलकर्णी आणि चोखोबांच्या भूमिकेत ओंकार देऊळगांवकर हे कलाकार सहभागी होणार आहेत.मकरंद खरवंडीकर(ऑर्गन),सुपर्ण प्रताप(तबला), शेखर दरवडे(पखवाज),अनुज दरवडे,किरण जोशी(टाळ),शार्दूल खोल्लम(चिपळ्या) हे साथसंगत करणार आहेत.
अभंग, भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीताचा सुरेल संगम या नाटकातून रसिकांना अनुभवता येणार असून संत साहित्याचा सांगीतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.पंडित विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष प्रयोगाला संगीत, नाट्य, साहित्य आणि संतपरंपरेचे अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संत चोखामेळा यांच्या समतावादी विचारांचा संदेश आणि दर्जेदार संगीत नाट्याचा अनुभव एकाच व्यासपीठावर घेण्याची ही रसिकांसाठी दुर्मीळ संधी ठरणार आहे.