सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 शहर

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर मोठा बिघाड! स्लॅब कोसळून बोगद्यात माती-पाण्याचा लोंढा; एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग बंद

डिजिटल पुणे    06-07-2026 12:37:58

पुणे :  प्रचंड गाजावाजा करुन बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महामार्गाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याचा प्रकार घडला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर पहिल्याच मुसळधार पावसात गंभीर प्रकार घडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅबचा काही भाग कोसळल्याने डोंगरावरील माती आणि पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आत शिरले. बोगद्याच्या छतामधून माती व पाण्याचा प्रचंड लोंढा रस्त्यावर कोसळतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. यापूर्वीही या प्रकल्पावर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता स्लॅब कोसळल्याच्या घटनेमुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लोणावळा घाट परिसरात गेल्या अनेक तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोणावळा आणि तळेगाव परिसरात अल्पावधीतच अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

सध्या बंद असलेले प्रमुख मार्ग

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग

जुना मुंबई–पुणे महामार्ग

मुंबई–गोवा महामार्ग (चिपळूणजवळील खवटी परिसर)

रायगडमधील पेण–खोपोली मार्ग

मुंबई–गोवा महामार्ग (सुकेळी खिंड)

माणगाव–पाली मार्ग

माणगाव–पुणे ताम्हिणी घाटमार्ग

वरंधा घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने घाट वाहतुकीसाठी बंद

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय या मार्गांवर प्रवास टाळावा. प्रवास करणे आवश्यक असल्यास प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती