पुणे : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून भारतीय हवामान विभागाने 6 आणि 7 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरडप्रवण क्षेत्र असलेल्या सिंहगड घाट परिसरात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 6 आणि 7 जुलै रोजी प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 8 जुलै रोजी हवामानाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई प्रवास पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली असून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल आणि खालापूर टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. खंडाळा-मंकी हिल आणि ठाकूरवाडी परिसरात रेल्वे रुळांवर माती व दगड आल्याने पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. परिणामी या मार्गावरील पाच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून रुळ साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मावळ तालुक्यातील पाठण गावात अतिवृष्टीमुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याचा भाग कोसळल्याने नंदू तिकोणे यांच्या घरावर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत तिकोणे, त्यांची पत्नी आणि मुलगा ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती असून एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
पावसामुळे राज्य परिवहन महामंडळानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे-मुंबई मार्गावरील सर्व एसटी बस सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. सकाळी मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरातून सुरक्षितपणे पुण्यात परत आणण्यात आल्या आहेत.
याशिवाय पुणे-महाड महामार्गावरील वरंधा घाटात वारवंड ते उंबर्डेवाडी दरम्यान चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. घाटमाथ्यावर रात्रभर 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
एकूणच पुणे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि घाट परिसरात जाणे टाळण्याचे तसेच प्रवासापूर्वी हवामान आणि वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.