सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  • मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळली; एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 जिल्हा

मुसळधार पावसाने महाराष्ट्र ठप्प! मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत; 'निसर्गचक्रातील बदल' हेच मुख्य कारण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान

डिजिटल पुणे    06-07-2026 16:55:49

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबई, पुणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते, रेल्वे आणि महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. विविध ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही दरडी कोसळल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. तसेच अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोलनाक्याजवळ पाणी साचल्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. दुसरीकडे ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती अद्याप कायम असून सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड, रोहा, नागोठणे, पेण आणि खोपोली या भागांत रात्रीभर पाणी साचले होते. काही भागांत पाणी ओसरू लागले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही जनजीवन विस्कळीत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दुपारनंतर वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि विशेषतः तरुणांनी पर्यटनस्थळांकडे जाणे टाळावे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमागे निसर्गचक्रातील बदल हे प्रमुख कारण आहे. शासनाने आवश्यक ती पूर्वतयारी केली होती, मात्र हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती