सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  • मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळली; एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 विश्लेषण

मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' लागू करावे, अन्यथा कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    06-07-2026 18:09:38

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश देतानाच खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य असेल तेथे *'वर्क फ्रॉम होम'*ची सुविधा द्यावी, असे स्पष्ट सांगितले. या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

भारतीय हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस, महानगरपालिका, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. भूस्खलन, पूरस्थिती आणि रस्ते बंद होण्याच्या घटनांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दरड कोसळलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

किनारपट्टी भागात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन NDRF आणि SDRFची पथके संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अतिवृष्टीचा धोका वाढल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष खबरदारीचे निर्देश दिले. काही भागांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पर्यटकांनी पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर व नाशिकमधील पर्यटनस्थळांकडे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संभाव्य भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती