पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी विविध प्रभावित भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा आणि समस्या जाणून घेत धोकादायक ठिकाणी आवश्यक ती तातडीची मदत करण्यात आली. तसेच संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाण्याला वाट करून देण्याचे काम करण्यात आले, त्यामुळे अनेक घरांमधील पाणी बाहेर काढण्यास मोठी मदत झाली.
या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शिवसेनेच्या वतीने विविध ठिकाणी शिवसेना मदत केंद्रे कार्यरत करण्यात आली असून, कोणत्याही नागरिकाला मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकटाच्या या काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शिवसेना अखंडपणे जनसेवेसाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.