नागपूर : पर्यटन आटोपून वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या नागपूरातील काही महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. राखीव डब्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी शिरल्याने महिलांना छेडछाड, अश्लील शेरेबाजी आणि विनयभंगाच्या प्रकारांना सामोरे जावे लागल्याचा दावा पीडितांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून वेळेवर कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी नागपूरातील काही महिला आपल्या कुटुंबीयांसह बिहार आणि उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी गेल्या होत्या. ३ जुलैच्या मध्यरात्री वाराणसीहून दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसने त्यांचे नागपूरकडे परतीचे आरक्षण होते. मात्र, रेल्वेत चढताना राखीव डब्यात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी असल्याचे दिसून आले. त्यामुळे डब्यात प्रवेश करणेही कठीण झाले. मोठ्या प्रयत्नांनी आपल्या जागेपर्यंत पोहोचताना महिलांना छेडछाड आणि अश्लील वर्तनाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकारानंतर पीडितांनी रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक १३९ तसेच सोशल मीडियावर तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेऊन कारवाईचे आश्वासन मिळाल्याचा दावा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नैनी रेल्वे स्थानकावर महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेसमोर आंदोलन करत आरोपींवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, गर्दीतून आरोपींची ओळख पटवण्यास सांगण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तसेच तिकीट तपासनीसही संबंधित डब्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित महिलांच्या आरोपानुसार, रात्री उशिरा डब्यातील दिवे बंद झाल्यानंतर काही व्यक्तींनी महिलांच्या शेजारी येऊन झोपणे, त्यांच्या शरीराला जाणूनबुजून स्पर्श करणे अशा किळसवाण्या कृती केल्या. या भीतीच्या वातावरणात महिलांना तब्बल २० तासांचा प्रवास करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरला पोहोचल्यानंतर पीडितांनी लोहमार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. मात्र, ही घटना उत्तर प्रदेशातील हद्दीत घडल्याने तेथे तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित महिलांना मोठा मानसिक धक्का बसला असून रेल्वेतील महिला सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.