पुणे : आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने या सर्व शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच शहरातील सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. दरम्यान, आळंदी आणि देहू परिसरात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क विस्कळीत झाला असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने वारकऱ्यांना पुणे शहरात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासाबरोबरच भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच शहरात मोठ्या जर्मन हँगर्सची उभारणी करण्यात आली असून अतिरिक्त निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय, शहरातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आली असून रविवारपर्यंत नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यात आला असून वारकऱ्यांच्या आगमनादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत माहिती देताना मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आळंदीकडे जाण्याऐवजी वारकऱ्यांनी पुण्यात थांबावे, यासाठी महापालिकेने सर्वतोपरी व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजुषा नागपुरे यांनी केले.